मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला श्री खंडेरायाची घटस्थापना होते. पाहिल्या दिवसापासून सहा दिवसांपर्यंत चालणारा हा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. याला देवदिवाळी असेही म्हणतात. प्रथम दिवशी मुख्य मंदिर आवारात पाखाळणी हा विधी झालेनंतर उत्सवमुर्तीना नवीन पोशाख परिधान करून बालद्वारी येथे घटस्थापना होते. श्री मल्हारी मार्तंड आणि मणी - मल्ल दैत्य यांचे सहा दिवस युद्ध झाले ते षडरात्र म्हणून साजरे केले जातात. सहाव्या दिवशी मल्हारी मार्तंडांनी मणी मल्ल दैत्यांचा संहार केला. मार्गशीर्ष शु. षष्ठी शनिवारी शततारका नक्षत्री देवलिंग रूपाने प्रकट झाले तोच हा चंपाषष्ठीचा दिवस ! या उत्सवावेळी समस्त पुजारी - सेवेकरी वर्गाकडून गडाला गडकोट मंदिर आवाराला विद्युत रोषणाई व दररोज विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम , महाप्रसादाचे आयोजन केले जाते. राज्यातील विविध भाविकांकडून मुख्य मंदिर, गाभारा पानाफुलांनी सजविण्यात येतो. त्यामुळे मार्तंड भैरवाची विविध रूपे भाविकांना पहावयास मिळतात. मार्गशीर्ष शु. पंचमीला जेजुरी नगरीतील मानाची चावडी येथून तेलहंडा निघतो. व मानकरी या हंड्यात तेल घालतात. मार्गशीर्ष शु. पंचमीला मल्हारी म्हाळसा यांचा तेलवणाचा विधी झाला होता.याअख्यायिकेमुळे रात्री याच हंड्यातील तेल देवांना लावून तेलवणाचा विधी पार पडतो. तर मुख्य चंपाषष्ठीचे दिवशी पुजा,अभिषेक आदी विधी करून घट उठविले जातात. पुरणपोळी, वांगे-भरीत रोडगा, कांद्याची पात यांचा नैवेद्य देवाला दाखविला जातो.नगरीतील घरा-घरात दिवटी पाजळली जाते. कोटंबा पुजन व तळी भंडारही केला जातो. जेजुरीसह राज्यातील बहुतांश विशेषत: शेतकरी वर्गात हा विधी करण्याची परंपरा आहे. या वर्षी दि. २७ नोव्हेंबर २0१९ रोजी घटस्थापना होणार असून मुख्य चंपाषष्ठी उत्सव २ डिसेंबर २0१९ रोजी संपन्न होणार आहे.