खंडेरायाच्या कुलधर्म कुलाचार व धार्मिक विधींमध्ये दिवटी बुधलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशी अख्यायिका आहे की, युद्धामध्ये मार्तंड भैरवांनी मणी-मल्ल दैत्यांचा वध केल्यानंतर सर्व देवगणांनी मार्तंड भैरवांना रत्नजडीत सिंहासनावर बसविले, सोन्याची रत्नजडित दिपीका (दिवटी) दाखवून (ओवाळून) त्यांची आरती केली. त्यामुळे मार्तंड भैरव सर्व देवांवर प्रसन्न झाले. त्या दिवसापासून हातात दिवट्या व तेलासाठी बुधल्या घेण्याची प्रथा सुरू झाली. दिवटी ही सोन्याची, चांदीची, पितळेची , लोखंडाची किंवा लाकडाची सुद्धा असते. तिचा आकार मशालीसारखाच असतो. धार्मिक विधींच्या वेळेस दिवटी प्रज्वलीत करून मार्तंड भैरवाची भक्तीभावाने पुजा अर्चा करावी. डाव्या हातात दिवटी घेऊन उजवा हात तिला लावून देवांना पायांपासून मस्तकापर्यंत ओवाळावे. त्यानंतर देवाची आरती करावी. आरती केल्यानंतर नैवेद्य दाखवावा व दुधाने दिपीका विझवावी. दिवटी हे ज्ञानाचे तर बुधली हे त्याग आणि समर्पणाचे प्रतिक आहे, म्हणूनच संत एकनाथ महाराज म्हणतात बोध बुधली, ज्ञानू दिवटी । उजळा महाद्वारी ।।
कोटंबा फोटो
दिवटी बुदली
कोटंबा | प्रत्येक खंडोबा भक्ताच्या घरात देवान्हात कोटंबा असतो. कोटंबा ही पितळी , लोखंडी, तांब्याचा अथवा लाकडापासून बनविलेला असतो. तो कधी चौकोनाचा तर कधी अष्टकोनाचाही असतो. म्हणून तर त्याला चार व आठ दिशांचे प्रतिक मानले जाते. याचा आकार तळाकडे निमुळता होत गेलेला असतो. कोटंबा हा पुर्णपात्र असल्याने त्यामध्ये देवाला नैवेद्य दाखविला जातो. दर रविवारी अमावस्या व सणावाराच्या दिवशी कोटंब्याचे पुजनही होते. काही खंडोबा भक्त देवाची भक्ती म्हणून दर रविवारी कोटंब्यातून वारी (भिक्षा) मागतात. ज्ञान कोटबा घेऊन आलो द्वारी | बोध भंडार लावीन परोपकारी ।। एका जनार्दनी विनवी श्रीहरी । वारी देऊनी प्रसन्न मल्हारी ।।
- संत एकनाथ महाराज (अर्थ: असा हा नाथरूपी भक्त ज्ञानाचा कोटंबा हातात घेऊन आणि बोधाचा भंडारा कपाळी लावून अद्वैताच्या महाद्वारात उभा आहे. जेजुरी वारी घडावी म्हणून खंडेरायाला विनंती करीत आहे. या भक्ताचा भक्तीभाव पाहून मल्हारी देवही प्रसन्न झाले आहेत.)