जेजुरीपासून २२ किमी अंतरावर पुरंदर तालुका व सातारा जिल्हयाचा हद्दीत दक्षिण दिशेला श्री क्षेत्र वीर असून पुरातन म्हस्कोबा देवाचे दगडी बांधकाम असणारे मंदिर आहे. गर्भगृहात श्रीनाथ व जोगेश्वरीच्या मुर्ती आहेत. हासुद्धा शिवशंकराचाच अवतार समजला जातो. श्रीनाथ हे काशी अथवा सोनोरीचे काळभैरव असून कमळोजी नामक भक्तामुळे वीर येथे वास्तव्यास आले अशी अख्यायिका आहे. माघ पौर्णीमा ते वद्य दशमीपर्यंत १० दिवस यात्रा चालते. दशमीचे दिवशी गुलालाचा रंग करून भाविकांवर उधळला जातो. याला मारामारी म्हणतात. माघ पौर्णिमेस रात्री १२ वा. पालख्यांची मिरवणूक निघते. पहाटे अडीच वाजता देवाचे लग्न लागते. या यात्रेमध्ये भाकणुकीचा मोठा कार्यक्रम असतो. वर्षाचा पर्जन्यकाळ, पिकपेरणी व उत्पन्न याचे भविष्य भाकणुकीतून वर्तविले जाते. दर अमावस्येला येथे मोठी यात्रा भरते.