खंडेरायाची राजधानी असलेल्या जेजुरी गडाच्या प्रथम पाच पायर्‍या वराने वधुला कडेवर उचलुन घेत चढावयाची परंपरा येथे आजही मोठ्या श्रद्धेने जोपासली जाते. शिवशंकर आणि पार्वती मल्हारगडावर संसाररूपी नांदत असल्याने विवाह झाल्यानंतर प्रपंचाची सुरूवात करण्यापुर्वी वर आणि वधु जेजुरी मल्हारगडावर दाखल होऊन कुलदेवतेचे दर्शन व आशिर्वाद घेतात. तत्पुर्वी ‘विवाहापर्यंत मात्यापित्याने तुझा संभाळ केला , देवा ब्राह्मणांच्या साक्षीने मंगल विधींमधून तुझा हात माझ्या हाती दिला येथून पुढील काळात सर्वस्वी तुझी जबाबदारी माझीच राहील मार्तंड भैरवाच्या साक्षीने तुझा सर्व भार माझ्या खांद्यावर घेऊन पाच पायर्‍या चढत शपथ घेत आहे ’ अशी यामागची भावना असल्याने आजही येथे विवाहानंतर हा विधी वर आणि वधु करतात. एकनिष्ठतेचे आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून या विधीकडे पाहिले जाते.