logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

जेजुरीचा मर्दानी मऱ्हाठमोळा दसरा उत्सव

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो. प्रथमतः सकाळी मुख्य मंदिरात पाखाळणी, धार्मिक विधी होवून उत्सव मुर्तीना नवीन पोशाख परिधान केले जातात. त्यानंतर सनई चौघड्यांच्या मंगलमय वाद्यात उत्सवमुर्ती बालद्वारीत आणून विधीवत घटस्थापना केली जाते आणि खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सवाची सुरूवात होते. नवरात्रीच्या काळामध्ये त्रिकाल सनई चौघडा वादन तसेच लोककलावंतांची हजेरी श्रींच्या समोर सादर केली जाते. गडकोट मंदिर आवाराला विद्युत रोषणाई केली जाते. नवरात्र व दसरा उत्सव हा जेजुरी नगरीतील अठरा पगड जाती धर्मातील समस्त ग्रामस्थ, खांदेकरी मानकरी यांच्या मानापानाचा उत्सव असल्याने नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेला जेजुरीकर हमखास गावाची वाट धरतो. उत्सवात सहभागी होत मानपान देत घेत आपली सेवा खंडेराया चरणी अर्पण करतो. मुख्य विजयादशमीच्या दिवशी तर जेजुरीकरांच्या उत्साहाला उधाणच आलेले असते. सायंकाळी ६ वा. चे दरम्यान मुख्य मंदिर गडकोट आवारातून उत्सवमुर्तीचा पालखी सोहळा भेटाभेट विधी व नगरप्रदक्षणेसाठी भंडाऱ्याच्या उधळणीत मार्गस्थ होतो. मध्यरात्रीच्या सुमारास जयाद्री डोंगर रांगेच्या कुशीमध्ये असलेल्या रमणा दरीमध्ये कडेपठार व गडकोट मंदिरातील दोन्ही पालख्यांची फटाक्यांच्या आतषबाजीत आरशातून भेटाभेट होते. आपटापुजन, शिलंगणाचे सोने लुटणे, स्मशान भुमी रोकडोबा मंदिराला भेट, रावणदहन, धनगर समाज बांधवांकडून लोकरीची उधळण करीत सुंबरान मांडणे - फटाक्यांची आतषबाजी, भंडाऱ्याची उधळण करीत पालखी सोहळा नगर प्रदक्षणा पुर्ण करून पुन्हा गडावर दाखल होतो. आणि ऐतिहासिक खंडा (तलवार) स्पर्धेला सुरूवात होते. यामध्ये पेशवे कालीन सरदार महिपतराव पानसे यांनी नवसपूर्तीसाठी खंडेरायास अर्पण केलेली सुमारे ४२ पौंड वजनाची तलवार एका हाताने तोलून धरणे, दाताने तलवार उचलणे, विविध चित्तथरारक कसरती करणे आदी स्पर्धा गावातील युवकांकडून गडकोट आवारात होत असल्याने त्याला मर्दानी दसरा असे नांव प्रचलीत झाले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना देवस्थानकडून सन्मानित केले जाते. समस्त ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी यांचा सन्मान तर लोककलावंतांना मानधन दिले जाते. रोजमुरा (तृणधान्य) वाटप होवून सुमारे १८ तास रंगणाऱ्या या सोहळ्याची सांगता होते.

या उत्सवामध्ये नगरीतील अठरा पगड जाती-धर्मातील समाज बांधवांना मानपान असल्याने व हा सर्व समाज एकत्र येत असल्याने या उत्सवाला मन्हाठमोळा दसरा असे संबोधले जाते. खंडेरायाच्या सर्व उत्सवांमध्ये दसरा उत्सव हा उत्सवांचा राजा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.