kuldharma Kulachar


कुलधर्म कुलाचार

तळीभंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे. ज्या घरात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक घरामध्ये तळी भंडार हमखास होतोच.... प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला घरातील देवासमोर तळीभंडार करण्याची प्रथा असते तर काही घरांमध्ये विजयादशमी ( दसरा ) व चंपाषष्ठी यादिवशी हा विधी होत असतो. तळी भंडारा विषयी सांगितले जाते मणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींना जो आनंद झाला त्या आनंदात मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला त्याचेच तळी भंडार हे प्रतिक आहे.जेजुरी मंदिरामध्ये भंडारगृह,बारद्वारीमध्ये किंवा पितळी कासवावर तळी भंडाराचा विधी केला जातो घरातील देवासमोर केला जाणारा विधी व मंदिरामध्ये केला जाणारा विधी यामध्ये थोडा फरक आहे देवापाशी आल्यानंतर आपली सर्व दुःख उधळून देवून देवापाशी आनंद मागितला जातो. खोब-याचे तुकडे व भंडार उधळला जातो.खोब-याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत जसे आपला वंश खोब-याच्या कुटक्यासारखा एकास दोन दोनास चार असा वाढत जावा तर दुसरे असे की पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडारा बरोबर उधळल्या जात असत परंतु कालौघात मोहरा शक्य नाही म्हणून खोबरे उधळले जाते सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे याहीपेक्षा श्रद्धेने केलेला विधी महत्वाचा अंतःकरणापासून दिलेली हाक देवाला पोहोचते घरी देवासमोर केला जाणारा तळी भंडाराचा विधी ताम्हणामध्ये विड्याची ( नागिणीची ) पाने, सुपारी , खोब-याचे तुकडे , भंडार इ. साहित्य घेऊन तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते तदनंतर पानाचा विडा ठेवून(काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी,रुमाल अथवा वस्त्र जमिनीवर ठेवतात) त्यावर ताम्हण ठेवले जाते.एक विडा देवासमोर मांडला जातो तळी उचलणा-या प्रत्येकापुढे एक एक विडा ठेवला जातो देवाला भंडार वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते.सरते शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते.

स्वच्छ विस्तीर्ण पात्र असावे l त्यामाजी अष्टदळ काढावे l
भंडारे पूरित करावे l मध्ये कलश स्थापिजे ll
नागवेलीदळेकरून l कलश सुशोभित करावा जाण l
कलशात पूर्णपात्र नारळ ठेवून l तळीकेचे पूजन करावे ll
मुष्टीभंडार आत ठेवावा l आप्त परकीय समुदाय मेळवावा l
येळकोट नामाचा उच्चार करावा l एकावच्छेदे करुनिया ll
तळी उचलून आधारपात्रावर ठेविजे l मग भंडार सर्वांस लाविजे l
प्रसाद सर्वांस वाटीजे l अत्यादरेकरुनिया ll
तळी भरावयाचे समयी l दीपिका करी असावी l
मग तळी पुन्हा उचलावी l मस्तकी धारण कीजे ll

तळी भांडार

येळकोट येळकोट जयमल्हार .......
अगडधूम नगारा ........सोन्याची जेजुरी .........
देव आले जेजुरा..........निळा घोडा ...........
पायात तोडा ........कमरी करगोटा .........
बेंबी हिरा ........मस्तकी तुरा .......
अंगावर शाल .......सदाही लाल .......
आरती करी ........म्हाळसा सुंदरी .......
देव ओवाळी नानापरी.......
खोब-याचा कुटका .........भांडाराचा भडका ...........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट .........
येळकोट येळकोट जयमल्हार........
अडकेल ते भडकेल .......भडकेल तो भंडार ........
बोल बोल हजारी ...वाघ्या मुरुळी ....
खंडोबा भगत प्रणाम प्रणाम.........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट........
येळकोट येळकोट जयमल्हार........

जागरण - गोंधळ

जागरण

जागरणाच्या परंपरेविषयी वाघ्या आपल्या कथनातून सांगतो कि पहिले जागरण श्रीकृष्णाने घातले होते म्हणून ते सर्वाना लागू झाले. जागरणाची मांडणी ही गोंधळा प्रमाणेच असते पाटावर स्वच्छ पीत वस्त्रावर धान्याचे अष्टदल काढून अथवा धान्याची रास करून त्यावर श्रीफळासहित कलश मांडला जातो. उसाच्या अथवा ज्वारीच्या पाच ताटांचा मांडव तयार करून त्यावर पुष्पमाला अड्कविली जाते. विड्याच्या पानावर सुपारी ठेवून या चौकावर खंडोबाचा टाक किंवा मूर्ती मांडली जाते. या चौकासमोर वाघ्या आणि मुरुळी गीत नृत्यामधून कुलस्वामी श्रीखंडेरायाची स्तुती करतात त्याबरोबरच यजमानांसाठी सुख समृद्धी भरभराट व आरोग्य मिळण्यासाठी विनवणी करतात. पुराणातील कथांचा वर्तमानातील दुष्कृत्यांशी संबंध जोडीत भाविक भक्तांना सोबत घेऊन चालणारा हा धार्मिक विधी म्हणजे मल्हारी कथन, मनोरंजन व प्रबोधन याचा सुंदर मिलाप होय. या सादरीकरणामध्ये आवाहन, गण, कथन व आरती अशी विभागणी असते तर वाघ्याच्या हातामध्ये डीमडी व मुरुळीच्या हातामध्ये घाटी(घंटी), सोबत करणा-यांकडे टाळ व तुणतुणे असते. जागरणाची सुरुवात करताना सर्व देवतांना चौकावर येण्याचे आवाहन केले जाते......

जेजुरीच्या खंडेराया जागराला या....या...
वाईच्या तुम्ही गणराया जागराला या....या..

अशा रितीने आवाहन झाल्यानंतर गण म्हंटला जातो त्यानंतर भाविक भक्तांनी मांडलेल्या जागरण विधीमध्ये वाघ्या मुरुळी भक्तांच्यावतीने मल्हारी मार्तंडाला विनवणी करतात.

देवा तूची खंडोबा तुझा त्रिभुवनी झेंडा
रूप आगळे दिसे पिवळे नाव तुझे प्रचंडा
हातामध्ये सोन्याचा खंडा
हात जोडितो पदर पसरतो देवा येऊ नका रागा
झोपले असतील भक्तांचे देवा व्हावे आता जागा..

गोंधळ

विष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण व ऋषीगणांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद सुरामध्ये आळवणी केली, अर्थात गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदू धर्मीयांमध्ये गोंधळाची परंपरा सुरु झाली, महाराष्ट्रा मध्ये याची खूप मोठी परंपरा आहे. विशेषत: तुळजाभवनी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरु झाली. अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा, गळ्यात कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आपल्या दारावर आलेली व्यक्ती म्हणजे गोंधळी. अंबेमातेच्या जयजयकार करीत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींचे गाणे सादर करतो. संबळाच्या तालावर नृत्यही करतो. त्याला 'संबळ गोंधळ' म्हणतात. तर काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. ज्याला 'काकडा गोंधळ' असे म्हटले जाते. देवीचा गुणगान गाणारा तो गोंधळी. आजही कोणत्याही शुभकार्याअगोदर जवळपास सर्व समाजात कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. हा धार्मिकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. ज्याठिकाणी गोंधळ घालावयाचा आहे त्या ठिकाणी पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून अष्टदल काढले जाते अथवा धान्याच्या राशीवर श्रीफळासह कलश मांडून उसाच्या किंवा ज्वारीच्या पाच ताटांचा मांडव तयार केला जातो व त्याला पुष्प माळा बांधली जाते. याला गोंधळाचा चौक असे म्हणतात. दिवटे पेटवतात, दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात.

तुळजापूर भवानी आई गोंधळाला यावं...
कोल्हापूर अंबाबाई गोंधळाला यावं ...
गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं ....

कुलस्वामिनी, ग्रामदेवी, आराध्य दैवते अशा सर्व दैवतांना गोंधळावर येण्याचे आवाहन केल्यांनतर देवीचे स्तवन करणारी पदे म्हंटली जातात त्यानंतर देवीचा जोगवा मागितला जातो

तुळजापूर भवानी आई गोंधळाला यावं...
अनादी निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषासूर मर्दना लागुनी
विविध तापाची करावया झाडणी
भक्ता लागी तू पावसी निर्वाणी
आईचा जोगवा जोगवा.... जोगवा मागीन

गोंधळयांकडे विवध वाद्ये असतात त्यापैकी संबळ हे सर्वात महत्वाचे वाद्य असून त्याच्या सोबतीला तुणतुणे व टाळही असतात. पूर्वीसारखा वेश परिधान करणारे गोंधळी फार थोडेच शिल्लक राहिले आहेत तर आता बदलत्या जमान्याप्रमाणे त्यांचा ही वेश बदलला आहे.

येळकोट नामाचा करिता गजर आनंद भक्ताच्या मनी दाटे..
करुनी कुळधर्म कुलाचार अवघ्या सात जन्माचे पाप घटे..
एका म्हणे तोडिता लंगर, कडी एक तुटे नी सहस्त्र विघ्न हटे..

लोकगीतामध्ये कुळधर्म कुलाचार आणि लंगर चे महत्व सांगितले आहे. जागरण गोंधळ झाल्यानंतर लंगर (लोखंडी साखळी) तोडण्याचा विधी होतो. यावेळी साखळीचे एक टोक खिळ्यामध्ये अडकविले जाते तर दुस-या बाजूचे टोक लंगर तोडणा-च्या हातात असते, 'सदानंदाचा येळकोट' च्या गजरात साखळीला हिसका देऊन कडी तोडली जाते. सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडल्यास कडी सहज तुटते आणि एक कडी तुटल्यानंतर हजार विघ्न हटतात इतके महत्व लंगर तोडण्याच्या विधीला आहे अशी भाविकांची श्रद्धा असते.

मल्हार वारी

मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून |
न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून ||

इंद्र व सकल देवगण गंधर्वांनी, कैलासावर भगवान शंकरासमोर दैत्यांचा संहार करण्याची व त्यांचे निर्दालन करण्याची वारी मागितली. आणि कालांतराने युद्ध होऊन मल्लासुराचा संहार केला, देवता गणांनी मागितलेली वारी सफल संपूर्ण झाली. हिच प्रथा कलीयुगामध्ये मल्हार वारी नावाने रूढ आहे. जागरणाचे वेळी वाघ्या मुरुळी वारीचे गीत गाऊन वारी मागतात, त्यावेळी वाघ्या किंवा मुरुळी, भाविकांनी दिलेली वारी पदरामध्ये घेतात. आजही मल्हारभक्त रविवारी, सोमवती, चंपाषष्ठी सारख्या उत्सवामध्ये सात घरी वारी मागतात. याच्या मागची संकल्पना अशी आहे कि, श्रीखंडोबा मानवी रुपामध्ये येऊन संकट निवारणाची वारी देऊन जातात. म्हणून श्रीक्षेत्र जेजुरी येथे कुळधर्म कुलाचाराचे वेळी वारी मागण्याची प्रथा आजही रूढ आहे. मल्हार वारीला मलूखानाची वारी असेही म्हणतात त्याला दंतकथेचा आधार दिला जातो तो असा, बादशाह औरंगझेब ने जेव्हा जेजुरगडावर स्वारी केली, तेव्हा मल्हारी मार्तंडाने अजामत (करामत) दाखविल्याने अजामतखान तसेच मलूखान नावाने जयजयकार करीत वारी मागितली. आजही मल्हारभक्त त्याप्रसंगाची आठवण म्हणून मलूखानाची वारी मागतात.